मी मध्यमवर्गीय अर्थात मिडलक्लास…..
आताच एक विनोदी व्हिडीओ पाहिला. मध्यमवर्गीय कोणाला म्हणायचं त्याची अगदी उदाहरणं देउन यथेच्छ खिल्ली उडवली होती. कसं ओळखायचं त्याला.त्याची रोजच्या सहज जगण्यातली उदाहरणे दिली होती.कोण हा मिडलक्लास. कसा वागतो तो.तो पाणीपुरी खायला गेला की हटकून एक सुखी पुरी मागून घेतोच. हाॅटेलमधून कधी काही मागवले तर मिळणारे प्लास्टिकचे डबे धुवून पुसून परत परत वापरायला किंवा कोणाला तरी काही वस्तू द्यायला उपयोगात आणतो.प्लास्टिकचे चमचे पण जपून ठेवतो.सहलीला गेला तर जिथे राहिला असेल त्या हाॅटेलातल्या आपल्या रूम मधल्या शिल्लक राहीलेल्या शांपूच्या छोट्या बाटल्या,साबणाच्या वड्या निघताना आपल्याबरोबर आणतो.हाॅटेलात गेला तर दोनचार टूथपिक, पेपर नॅपकिन, बडीशेप आपल्याबरोबर घेतो.दिवाळीत भेट आलेले पुठ्ठ्याचे गिफ्ट बाॅक्स नीट सांभाळून ठेवतो. त्यांच्या वरचे चकचकीत पेपर(रॅपर) सुध्दा अगदी व्यवस्थित घडी करून ठेवतो, परत कधीतरी गिफ्ट रॅपिंगला उपयोगी पडतील म्हणून. लग्न पत्रिकाच्या मागचे कोरे रंगीत गुळगुळीत कागद पण कापून जपून ठेवतो. साड्यांच्या दुकानातून मिळालेल्या पिशव्या जपून ठेवतो. कधीकधी एखादी ॲडीशनल पिशवी मागून घेतो.मिळालेल्या कॅरीबॅग साठवून ठेवतो घरच्या कचऱ्याच्या डब्यात घालण्यासाठी.घरातले जूने कपडे व्यवस्थित चौकोनी कापून शिवून त्याची पायपुसणी बनवतो.
पण माझ्या मनात असलेल्या मध्यमवर्गाच्या व्याख्या मात्र थोड्या वेगळ्या आहेत. जो आपल्या गाडीतून (हल्ली मध्यमवर्गीयांकडे पण स्वत:च्या गाड्या असतात)जवळच फेरी मारायला जात असेल तर बिल्डींगच्या खाली बसलेल्या मुलांना, आजीआजोबांना चला चक्कर मारायला असा आग्रह करतो.त्याला गाडीच्या मागच्या सीट रिकाम्या असताना गाडी न्यायची तर काही तरी चूक झाली आहे असं वाटतं.चैनच पडत नाही.खूप वेळ बस आली नाही आणि टॅक्सी करायची वेळ आली तर स्टाॅपवरच्या चारदोन लोकांना मी ह्या ठिकाणी जातोय, कोणाला यायचय का असं मनापासून विचारतो.एवीतेवी टॅक्सीचे भाडे देणारच ना, मग अजून दोघांना बरोबर घेउ त्यांचा प्रवास पण सुखाचा होईल असा विचार करतो. आपल्याला एखादी वस्तू कन्सेशन मध्ये मिळत असेल तर शेजाऱ्याला पण ती मिळावी म्हणून प्रयत्न करतो.रेल्वेचा पास संपायच्या आधीच दोन दिवस पुढचा पास काढतो आणि आपल्याकडे पास आहे हे माहित असून सुध्दा टिसी गाडीत चढला की पर्स उघडून पास आहे का पहातो.बस मधून उतरायची वेळ आली की तिकीट काढले नसेल तर कंडक्टरला हाका मारून बोलावून बोलावून इमानदारीत तिकीट घेतो. कितीही लांब रांग असली तरी तिकीट काढल्याशिवाय ट्रेनमध्ये चढत नाही तो.मित्र भेटला आणि चहा घेउया म्हणाला तर चहाचे पैसे स्वत:च देतो. मोठ्या महागड्या हाॅटेलमध्ये शिरून मित्राला खर्चात पाडण्यापेक्षा छोट्याश्या टपरीवर चहा पिणे पसंत करतो. कोणाबरोबर रिक्षातून गेला तर रिक्षाचे भाडे आधीच हातात काढून ठेवतो आणि पटकन देतो सुध्दा.घरी सहज करता येण्याजोगे पदार्थ (पोहे ,शिरा) शक्यतो विकत आणत नाही. नाईलाज असेल तरच आणतो. ट्रिपमधून कितीही दमून आला असला तरी घरी आल्यावर बाहेरचे खाउन कंटाळा आला आहे ( आणि खरंच कंटाळा आलेला असतो) असं म्हणून वरणभात किंवा गेलाबाजार मुगातांदळाच्या खिचडीचा कुकर लावतो. जर दरवाज्यात वारकरी आले तर धाडकन दरवाजा न लावता‘माझी आजी पण वारीला जायची ‘असं म्हणून त्यांना कमीतकमी एकवीस रुपये तरी देतो. गणपती नवरात्रीची वर्गणी मागणाऱ्यांना पण काहीही न सुनावता कमीतकमी एकवीस रूपये तरी काढून देतो तो. ट्रेनमध्ये नशीबाने सीट मिळाली तर थोडावेळ बसल्यावर खूप वेळ उभे राहिलेल्याला सीट द्यावी असा विचार ज्याच्या मनात येतो.जो पेशंटला भेटायला गेलातर फुलांऐवजी फळं किंवा नारळपाणी घ्यावे असा विचार करतो. दरवर्षी इमानेइतबारे टॅक्स भरतो. जो कुठल्याही लग्नाला गेला की कमीतकमी पाचशे रूपये तरी आहेर देतोच. मध्येमध्ये टॅक्स फाईल केलेले स्टेटमेंट लावलेली फाईल व्यवस्थित ठेवली आहे का ते बघतो.काही चांगली वस्तू, भाजी, फळं मिळाली तर ती घेण्यासाठी कापडी फोल्डींग पिशवी ज्याच्या खिशात हमखास असते तो.लाईट बील, पाण्याचे बील, सोसायटीचा मेंटेनन्स न चुकता ड्यू डेट आधी भरतो तो.ज्याच्या दारात पोलीस, देणेकरी कधीही उभा राहात नाही. आणि चुकून राहिलाच तर ज्याला मेल्याहून मेल्यासारखे होते तो.आणि हो मतदानसुध्दा न चुकता करतो.
थोडक्यात काय मध्यमवर्ग, मिडलक्लास तो असतो जो धडपणे गरीबासारखे वागू शकत नाही(तसे वागणे त्याला जमत नाही,लोक काय म्हणतील) आणि धड श्रीमंतासारखे (तसे वागणे शक्य नाही आणि झेपणार नाही) वागू शकत नाही. पण सगळे नियम, परंपरा, कायदेकानून अटी, रूढी,संबंध,नातीगोती इमानदारीत पाळतो तो मिडलक्लास.जो एका पिसाने मोर होउन नाचत नाही आणि ज्याचा अंगापेक्षा बोंगा जड नसतो तो.तोच सांभाळतो सगळ्याचा तोल म्हणूनच कोणीही कितीही खिल्ली उडवली तरी मला मध्यमवर्गी (मिडलक्लास) म्हणवून घेण्यात आनंद आहे आणि मिडलक्लास असण्याचा अभिमान आहे.
हा लेख श्रीमती सविता केळकर यांचा आहे.मला मनापासून आवडला म्हणून आपणा पर्यंत पोचवत आहे.