झाशीच्या राणीच्या मुलाचं पुढं काय झालं?
झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजे अख्ख्या भारताचा अभिमान. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात तिने इंग्रजांना दिलेल्या लढ्याची कहाणी प्रत्येक भारतीयाच्या जिभेवर असते. परवा रिलीज झालेला कंगना राणावतचा मनिकर्निका थिएटर मध्ये तुफान गर्दी खेचतोय.
“बुंदेले हर बोलो के मुँह हम ने सुनी कहानी थी
खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी…”
पेशव्यांचे कारकून मोरोपंत तांब्याची मनिकर्निका झाशी संस्थानचे राजे गंगाधरपंत नेवाळकरांशी लग्न करून राणी लक्ष्मीबाई होते. आपल्या तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू, आपल्या पतीचा मृत्यू पचवते. पतीच्या माघारी आपल्या दत्तक मुलाला राजगादीवर स्वतः राज्यकारभार हाती घेते.
ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी दत्तकविधान रद्द करून झाशी संस्थान खालसा करतो. आणि या अन्यायाविरुद्ध आपल्या हक्कासाठी झाशीची राणी मदमस्त ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढा पुकारते. दत्तक मुलाला घोड्यावर आपल्या पाठीशी घेऊन ती स्वतः तलवार घेऊन रणांगणात उतरते आणि लढता लढता ग्वाल्हेरच्या रणांगणावर तिला वीरमरण प्राप्त होत.
झाशीची राणी म्हटल की लष्करी पोशाखात हातात समशेर पाठीवर बाळ घेऊन अश्वरोहिनी मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. तिचे अनेक पुतळे सुद्धा असेच आहेत. तिच्या पाठीवर असणाऱ्या त्या बाळाचं पुढ काय झालं ? याच मुलाच्या हक्कासाठी राणीने आपल्या प्राणाची आहुती दिली होती त्याचं पुढ काय झालं याची उत्सुकता सगळ्यानाच असते.
झाशीचे राजे गंगाधरपंतानी आपल्या नवजात मुलाच्या मृत्यूनंतर नात्यातल्या वासुदेव नेवाळकर यांच्या मुलाला आनंदरावला दत्तक घेतले आणि त्याच नामकरण केलं दामोदरराव. त्याचा जन्म १८४९साली झाला होता. झाशीच्या राणीच्या स्वातंत्र्य लढ्यावेळी तो आठ नऊ वर्षाचा असावा.
ग्वाल्हेरच्या लढाईत राणीला हौताम्य आलं पण या दामोदरराव वाचला. झाशीच्या राणीच्या चाकरीमधली विश्वासु काशीबाई हिच्यावर त्याची जबाबदारी देण्यात आली. त्याला तीन दिवस ग्वाल्हेर मध्ये लपवण्यात आले.
नानेखान रिसालदार, रामचंद्र देशमुख, रघुनाथ सिंग यांनी साठ उंट, बावीस घोडे यांच्यासह दामोदरराव याला घेऊन बिठूरच्या पेशव्याच्या छावणीतून पळ काढला. जंगलामध्ये लपतछपत ते बुंदेलखंडच्या दिशेने जात होते. रस्त्यात इंग्रजांच्या भीतीने त्यांना कोणीही आसरा दिला नाही. वेदावती नदीच्या काठाजवळ एका गुहेत झाशीच्या सैनिकांनी दामोदररावला लपवले. जवळचे सगळे पैसे संपले होते.
झाशीच्या राणीची शेवटची आठवण असलेले दामोदररावच्या हातातले ३२ तोळ्याचे सोन्याचे तोडेदेखील त्यांना विकावे लागले.
कित्येक महिने अन्नपाण्याशिवाय काढल्यावर त्याची तब्येत खालावत गेली होती. झाशीच्या दौलतीच्या वारसदाराचे प्राण वाचवण्यासाठी अखेर नानेखान रिसालदाराने इंग्रजांसमवेत मध्यस्ती केली. माउंट फ्लिंक नावाचा एक इंग्रज अधिकारी त्याच्या विश्वासातला होता. नानेखान त्याला म्हणाला,
“जे काही घडले त्याच्यात या दहा वर्षाच्या मुलाची काय चूक? आईविना जंगलात एखाद्या प्राण्यासारखा तो जगण्याची तडफड करत आहे. त्याचा जीव वाचवा म्हणजे अख्ख्या हिंदुस्तानी जनतेची दुवा तुम्हाला लागेल.”
कफल्लक असलेल्या या झाशीच्या राजाला इंदोरच्या इंग्रज छावणीत आणण्यात आले. तिथे रिचर्ड शेक्सपियर नावाच्या एजंटने त्याची व्यवस्था लावून दिली. दामोदररावला वार्षिक १०००० रुपयांची पेन्शन मंजूर करण्यात आली होती. त्याच्या इंग्रजी, उर्दू आणि मराठी शिक्षणासाठी काश्मिरी पंडीत मुन्शी धर्मनारायण यांची नियुक्ती करण्यात आली. झाशीच्या खजिन्यातील काहीही रक्कम दामोदर रावला देण्यास इंग्रजांनी नकार दिला.
इंदौरमध्ये तो राहू लागला. योग्य वयात आल्यावर त्याच्या सख्ख्या आईने त्याचे लग्न लावून दिले. पण त्याच्या बायकोचे अकाली निधन झाले. यानंतर त्याचा परत विवाह झाला. त्याला लक्ष्मणराव नावाचा मुलगा झाला. कंपनीचे राज्य जाऊन इंग्लंडच्या राणीचे राज्य सुरु झाल्यावर त्याने अनेकदा आपले हक्क परत मिळावेत यासाठी प्रयत्न केले . पण त्यात तो काही यशस्वी होऊ शकला नाही.
झाशीच्या लढाऊ इतिहासाचं ओझं कायम त्याच्यावर राहिलं. ब्रिटीशांच्या पेन्शनवर जगण्याची नामुष्की त्याला कायम आतून खात राहिली. दामोदररावला फोटोग्राफीची आवड होती. २८ मे १९०६ साली वयाच्या ५६व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
दामोदररावच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी त्याच्या वारसदारांना मिळणारे मासिक २०० रुपयाचे पेन्शन बंड करण्यात आले. त्याचा मुलगा लक्ष्मणराव ज्याने आपले आडनाव झाशीवाले लावण्यास सुरवात केली होती तो इंदौरच्या कोर्टाच्या बाहेर बसून लोकांना टायपिंग चे काम करून आपले उदरनिर्वाह चालवत होता.
कित्येक वर्षे झाशीच्या राणीचे हे वारसदार लोकांच्या विस्मरणात गेले होते. २००७साली मोहन नेपाळी या इतिहास संशोधकाने त्यांना शोधून काढले.
२०१५ साली झाशीच्या किल्ल्यामध्ये झालेल्या “झांसी जन महोत्सव” या कार्यक्रमात झाशीच्या राणीचे पाचवे वंशज अरुण कृष्णराव झाशीवाले हजर होते. त्यावेळी सत्तर वर्षाचे असलेले अरुणकुमार हे मध्यप्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्डातून ज्युनिअर इंजिनिअर या पदावरून निवृत्त झाले आहेत. तर त्यांचा मुलगा योगेश झाशीवाले हा नागपूर येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो.