लाल मातीतला हुंकार

Red Rocks” by Matt Bango/ CC0 1.0

सचिन जवळकोटे –

‘बाळाला नुसता जन्म देऊन आई होता येत नाही; त्याचं अस्तित्व सिद्ध होण्यासाठी परिपूर्ण माताही बनावं लागतं,’ हे संतोषच्या आईनं कुटुंबाला पटवून दिलं. तिच्या शस्त्रक्रियेसाठी गोळा केलेले पैसे कोल्हापूरच्या तालमीत पाठवून देण्यात आले. त्यानंतर संतोष कर्नाटकात गेला. मैदान मारून आला. ‘किडनी स्टोन’च्या त्रासानं तळमळणारी आईही वेदना विसरून हसली. हिंदकेसरी किताब पटकावणार्‍या संतोषची ही अफलातून कहाणी..   मुलगा इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावा, असं बहुतांश पालकांना वाटत असतं. त्यासाठी वाट्टेल तो खर्च सोसायची तयारीही असते; परंतु जगावेगळा मार्ग चोखाळणारा मुलगा आगळाच असतो अन् त्यापायी स्वत:च्या पोटाला चिमटे काढणारे पालकही वेगळेच असतात. ‘लाल माती’च्या स्पर्शानं झपाटून गेलेल्या संतोष वेताळची कहाणीही अशीच आगळी-वेगळी. कर्‍हाड तालुक्यातलं सुर्ली गाव तसं दूर कोपर्‍यात बसलेलं. दळण-वळणाअभावी जगापेक्षा मागेच राहिलेलं. अशा या गावात जन्मलेला संतोष लहानपणापासूनच शड्ड ठोकण्यात रमलेला. शाळेतली ‘काळी पाटी’ गिरविण्याऐवजी तालमीतली ‘लाल माती’ अंगावर उधळून घेण्यातच दंग झालेला. कुस्तीचं वारं त्याच्या अंगात आजोळकडून भिनलेलं. आजोबा ज्योतिभाऊ पवार हे सुद्धा जुन्या काळातले नामवंत मल्ल. सांगली जिल्ह्यातले अनेक फड त्यांनी गाजविलेले. कैक मैदानंही मारलेली. त्यामुळं मोठेपणी आजोबांसारखं ‘पहिलवान’ व्हायचं, हेच स्वप्न संतोषनंही उराशी बाळगलेलं. सुरुवातीला त्याचं हे जगावेगळं स्वप्न घरच्या मंडळींनीही एवढं मनावर घेतलं नव्हतं; परंतु शाळेतल्या कुस्ती स्पर्धेत त्यानं बक्षिसं जिंकली. हायस्कूलमध्येही त्याच्या कुस्तीची चर्चा होऊ लागली; तेव्हा आई-वडिलांनाही वाटू लागलं, की ‘पोराला अडवायला नको. त्याला पहिलवानच व्हायचं असंल तर होऊन जाऊ दे!’ मग काय; दहावीनंतर तो आजोबांचं बोट धरून थेट कोल्हापूरला गेला. तिथं गंगावेश तालमीची लाल माती संतोषच्या अंगाला लावण्यात आली. तो त्या मातीत पुरता रमला. डावावर डाव शिकू लागला. कधी ‘मोळी’ तर कधी ‘पोकळ घिस्सा’.. एकेक डावपेच टाकू लागला. ..अन् हा काळ संतोषच्या कुटुंबासाठी जणू सत्त्वपरीक्षाच घेणारा ठरला. त्याचे वडील एसटीत कंडक्टर. आई दीड-दोन एकरची शेती करण्यात गुंतलेली. घरात तीन मुली अन् दोन मुलं. पैकी एक मुलगा संतोष कोल्हापुरात अन् दुसरा महाविद्यालयात. शेत नुसतं नावालाच. उत्पन्न कमी अन् खर्चच जास्त. त्यात वडिलांच्या हातात जेमतेम पाच- साडेपाच हजार पगार. अशा परिस्थितीत ‘संतोषचा खुराक’ म्हणजे वेताळ कुटुंबासाठी ‘पांढरा हत्ती’ ठरलेला. संतोष पहाटे उठून व्यायामाला लागायचा. अंग भरून घाम गाळल्यानंतर दोन-दोन लिटर दूध अन् किलो-किलोची फळं. जेवताना तूप लावलेल्या बारा-बारा चपात्या. जेवढं जास्त खाणं तेवढी जास्त चरबी झिजवायची.. त्यासाठी दंड अन् पिंडर्‍यांना गोळे येईपर्यंत व्यायाम करायचा. त्याची ही अविरत अन् अतोनात मेहनत फळाला येत होती. शरीर तगडं बनत चाललं होतं; मात्र त्यासाठी लागणारा ‘खुराक’ देताना त्याच्या कुटुंबाची भलतीच दमछाक होत होती. संतोषच्या खुराकावर खर्च व्हायचे दरमहा साडेतीन-चार हजार. अन् हातात पगार फक्त पाच हजार ! तरीही त्याचे आई-वडील डगमगले नाहीत. चार हजार त्याला पाठवून फक्त एक हजारात त्यांनी सहा लोकांचं घर चालवलं. तिकडं संतोषला दोन-दोन, तीन-तीन लिटर दूध मिळावं म्हणून इकडं एकवेळचा कप-अर्धा कप चहाही घरच्यांनी बंद करून टाकला. वडील कामावर जाताना अर्धाच डबा नेऊ लागले. आईसुद्धा शेतात फक्त पाणी पिऊन कामात गुंतू लागली. हे पाहून भाऊ अन् बहिणींनीही काटकसरीचा मार्ग अवलंबला. आई-वडिलांची आबाळ होत होती. भावंडांना मन मारावं लागत होतं; परंतु तरीही ही सारी मंडळी आतून कुठंतरी सुखावलेली होती; कारण तिकडे संतोष ‘गंगावेश तालीम’ गाजवत चालला होता. ‘सरपंच केसरी’सह अनेक स्पर्धांमध्ये मैदानावर नाव कोरत होता. याच दरम्यान संतोषच्या आईला ‘किडनी स्टोन’चा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी ‘ऑपरेशन करावं लागेल,’ असं सांगितलं. पळापळ सुरू झाली. इकडून-तिकडून पैसे जमा केले. ऑपरेशनची तारीखही ठरली, एवढय़ात कोल्हापूरहून निरोप आला; ‘संतोष एका मोठय़ा स्पर्धेसाठी कर्नाटकात चाललाय. त्या तयारीसाठी पाच हजार पाहिजेत.’ निरोप कानी पडताच घरातले सारे स्तब्ध झाले. भावंडांची चुळबूळ सुरू झाली. वडील गंभीरपणे येरझार्‍या मारू लागले. तेव्हा आई शांतपणे उत्तरली; ‘माझं ऑपरेशन नंतर बघू, हे पैसे संतोषला देऊन टाका!’ आईचं ऐकून सारेच अवाक्; कारण डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, की ‘जास्त दिवस दुखणं अंगावर काढू नका. पुढं त्रास होईल.’ बराच वेळ या विषयावर चर्चा झाली. वास्तव अन् भावना या दोन्ही मुद्दय़ांवर सर्वांनी आपली भूमिका स्पष्ट केली; मात्र अखेर आईचं नातंच जिंकलं. ‘बाळाला नुसता जन्म देऊन आई होता येत नाही; त्याचं अस्तित्व सिद्ध होण्यासाठी परिपूर्ण माताही बनावं लागतं,’ हे तिनं कुटुंबाला पटवून दिलं. तिच्या शस्त्रक्रियेसाठी जमा केलेले पैसे कोल्हापूरला पाठवून देण्यात आले. त्यानंतर संतोष कर्नाटकात गेला. मैदान मारून आला. वडिलांची छाती फुलून आली; भावंडही खुश झाली. ‘किडनी स्टोन’च्या त्रासानं तळमळणारी आईही वेदना विसरून हसली. त्यानंतर तब्बल वर्षभर आईनं गावातली जडी-बुटी खाऊन कळ सोसली. कशीबशी वेळ मारून नेली. लेकराच्या नावासाठी स्वत:च्या पोटाला चिमटे घेतले. याच काळात मिरज तालुक्यातील एका कुस्ती स्पर्धेत संतोषच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्याची नस तुटून डाव्या हाताला आतल्या आत रक्तस्त्राव झाला. डॉक्टरांनी त्याला दीर्घकाळ विश्रांतीचा सल्ला दिला. झालं; संतोष ‘गंगावेश’ सोडून पुन्हा सुर्लीत आला. जवळपास दीड-दोन वर्षे तो गावातच राहिला. या काळातही त्याच्यातला पहिलवान गप्प बसू देत नव्हता. त्यानं गावातली भग्नावशेष पावलेली तालीम शोधून काढली. गावातल्या तरुणांना सोबत घेऊन त्याची स्वच्छता केली. आखाड्यात माती टाकून अन् आजूबाजूला पाणी मारून तालमीला अक्षरश: जान आणली. आजपावेतो उकिरड्यात हरपलेली तालीम आता पोरां-बाळांच्या हुंकारानं दणाणू लागली. शड्डंचा आवाज घुमू लागला. गावच्या यात्रेत कुस्तीचं मैदान भरविण्याची कल्पनाही संतोषनं गावकर्‍यांना पटवून दिली. मग काय; सारे झाडून कामाला लागले. लोकवर्गणीतून तब्बल एक लाखाची कुस्ती सुर्ली गावात लावली गेली. पंचक्रोशीतल्या टोप्या सुर्लीच्या मैदानात उडाल्या. शिट्टय़ांचा आवाज घुमला. हे पाहून आता आजूबाजूच्या गावांनीही यात्रेत कुस्ती स्पर्धा सुरू केल्या. दरम्यान, संतोषच्या आजाराची माहिती सांगलीचे पहिलवान संभाजी पाटील यांच्या कानावर गेली. त्यांनी तातडीनं स्वखर्चानं संतोषच्या हातावर शस्त्रक्रिया करायला लावली. संतोष पुन्हा एकदा तंदुरुस्त झाला. शड्ड ठोकायला मोकळा झाला. दोन वर्षं दाबून ठेवलेली अंगातली रग पुन्हा उसळी मारू लागली. च्यापूर्वी बक्षिसातून मिळालेल्या पैशांनी खुराक सुरू झाला. घरच्यांना त्रास न देता संतोषच्या बलदंड स्नायूंना पुन्हा एकदा धुमारे फुटू लागले. गंगावेश तालमीचा आखाडा संतोषच्या ताकदीचा अंदाज घेता घेता दमू लागला. त्याचा चपळपणा पाहून हरपून जाऊ लागला. याचवेळी हरियाणातल्या पानिपतच्या ‘हिंदकेसरी’ स्पर्धेची खबर त्याच्या कानावर गेली. खरंतर, तो सध्या ‘महाराष्ट्र केसरी’ची तयारी करत होता; परंतु ‘संधी आलीच आहे. तर सरावासाठी जाऊन यायला काय हरकत आहे?’ असा विचार करून संतोष हरियाणात पोहोचला. एकेक मल्लाची पाठ मातीला लावून तो ‘फायनल’पर्यंत पोहोचला. दिल्लीच्या देवेंद्रकुमारला ‘पोकळ घिस्सा’ डावावर चितपट करून त्यांनं मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब मिळविला. ध्यानीमनी नसताना सर्वोच्च किताब पटकाविणार्‍या संतोषची ही ‘गुड न्यूज’ कानावर पडताच सुर्ली गावात अक्षरश: दिवाळी साजरी झाली. गुरुवारी त्याची कर्‍हाडातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. हा मान एकट्या संतोषचा नव्हता. तो सुर्लीचा होता. कर्‍हाडचा होता.. अन् तमाम महाराष्ट्रवासीयांचाही होता; कारण संतोष हा नववा मराठी ‘हिंदकेसरी’ होता. आईच्या वेदनेवर मात करणारा लाल मातीतला अस्सल हुंकार होता! (लेखक लोकमत सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.