संकलक हर्षद जाधव

(ब्रेल जागृती मराठी ब्रेल त्रैमासिकाच्या जानेवारी-मार्च २०१३ च्या अंकातून साभार.)

काटेरी अंथरुणावर जन्माला येऊन त्या अंथरुणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात पण बोचणार्‍या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्काचं सुख मिळविण्याची ज्यांच्यात हिम्मत असते ते असामान्य होतात. भारत नावाच्या पुरुषप्रधान अडथळ्यातून वाट काढत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानामृताचा आनंद देणार्‍या सावित्रीबाई फुले या अशाच असामान्य ज्ञानगंगोत्री होत.
ज्या काळात भयानक अज्ञान, कर्मकांड, जातिभेद, वर्णभेद, बालविवाह, केशवपन, देवदासी प्रथा, सतीची चाल, अज्ञान, स्पृश्य-अस्पृश्य इत्यादी महाव्याधींनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देश ग्रासला गेला होता. स्त्रीला तर स्वतंत्र व्यक्तिमत्व, मन, भावना, विरोधचा अधिकार, बुध्दी असते हे देखील नाकारले होते. स्त्रीयादेखील प्रदीर्घ आघातामुळे आपले स्वत्व गमावून बसल्या होत्या, स्त्रीयांचा जन्मच मुळी अशुभ मानला जाई. स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य वस्तू असून स्त्री व शुद्रांना विद्येचा अधिकार ही नव्हता. स्त्री परतंत्र, अबला आहे, विद्याभ्यासाने ती कुमार्गास लागेल, ती दोषांची व अज्ञानाची खाण आहे. तिला शिकवीले तर अकाली वैधव्य येते. स्त्री शिक्षण म्हणजे समाजाच्या दृष्टीने भ्रष्टाचार. स्त्रीने पायात वहाण घालणेही अपवित्र. थोडक्यात संपुर्ण समाज हा आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या गुलामगिरीत खितपत पडला होता.
अशी, प्रतिगामी, प्रतिकूल सामाजीक परिस्थिती असलेल्या काळात, ३ जानेवारी १८३१ रोजी, सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी सावित्रीबाईंचा जन्म झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील. सावित्रीबाईंच्या जन्मावेळी इंग्रज सत्ता प्रस्थापित होऊ लागलेली. त्यामुळे वातावरण दबलेलं, लाचारीचं, पारतंत्र्याचं होतं. पण तरीही बहुतांश समाजाला इंग्रजांची सवय झालेली. याच वेळी सनातन्यांनीही उच्छाद मांडलेला. देव आणि धर्माच्या नावाखाली वर्चस्व गाजविण्यासाठी तत्कालीन सवर्ण इतर जातींचा छळ करत होते. हिंदू समाजात या काळात स्त्री म्हणजे निव्वळ एक उपभोग्य वस्तू होती. तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता, एवढेच नव्हे तर ते पाप होते. ती काही मागू शकत नव्हती, तिला ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार नव्हता. पुरुषांनी घालून दिलेल्या चाकोर्‍यांमध्ये आयुष्यभर यंत्राप्रमाणे धावत राहायचे आणि झिजत जायचे एवढंच त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट होतं.
एकूणच स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फुल हिसकावून घेणार्‍या धटिंगणाला त्यांनी अद्दल घडविली, तर पक्ष्यांची अंडी खाणार्‍या नागाला त्यांनी ठेचून मारलं. सनातन्यांच्या विरोधाला सामोरे जाण्याची ही तयारी त्यांनी तळमळीनं आणि धाडसानं केली.
सावित्रीबाईंच्या लग्नाच्या वेळी त्यांचं वय नऊ वर्षांचं होतं. म्हणजे त्या वेळच्या रूढीनुसार लग्नाला उशीरच! त्यांचे पती जोतिरावांचं वय तेरा वर्षांचं, म्हणजे तेही `मोठेच’! लग्नाला उशीर झालेलं हे जोडपं फाल्गुन वद्य ५, शके १७६५ (इ.स. १८४०) रोजी विवाहबद्ध झालं. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचं व बोलताही यायचं. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. यावरून त्यांच्या मनात असलेले अक्षरांचे आकर्षणही दिसून येते. एकूणच ज्ञानासाठी आतूर असलेले दोन तेजस्वी जीवनप्रवाह एक झाले होते.  ‘आपण शिकलो की पाप कसं?’ हा जोतिरावांनी वडिलांना विचारलेला प्रश्र्न सावित्रीला पतीच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला. ‘सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं’. या शब्दात त्यांनी पतीला ताकद दिली. जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवलं. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतलं आणि भारताच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण घटना घडली.
१ मे, १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे भिडेंच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आलं की गोर्‍या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील. नरकाच्या भीतीने का होईना लोक शिक्षणाला होकार देऊ लागले.
दिनांक १ जानेवारी, १८४८ रोजी भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. ही अखंड हिंदुस्थानातली स्वदेशीय व्यक्तीने काढलेली पहिलीच मुलींची शाळा. घनघोर  अंधारात  ज्ञानाचा  दीप  उजळला ! अन्यायाच्या  छाताडावर  स्त्रीने  पहिला  वार  केला. सावित्रीबाई ‘हेडमिस्ट्रेस’ म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला…. अशा बोंबा मारून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण नकळत्या वयात नाग ठेचणार्‍या सावित्रीला माणसांची भीती वाटणं शक्य नव्हतं. अनेक संकटं पार करत हा ज्ञानप्रसाराचा प्रवास चालूच राहिला. घर सोडावं लागलं. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात झाले. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. लवकरच  क्षुद्र  – अतिक्षुद्र  समजल्या  जाणाऱ्या  समाजासाठी  प्रौढ  शिक्षण  देणारी  शाळा  सुरु  केली . शिक्षण  हेच  दलित  उद्धाराचे  साधन  आहे  हे  नेमके  ओळखून फुले  दाम्पत्याने  “Native Female School” आणि  “The Society for Pramoting Edcation” अशा  संस्था  स्थापन करून पुणे  परिसरात  शिक्षण  संस्थांचे   जाले  निर्माण  केले . सुरुवातीला मुलींना शाळेत पाठवायला पालक घाबरत तेव्हा फुले दांपत्याने घरोघरी पालकांना भेटून त्यांचे मत अनुकूल बनविले, त्यामुळे शाळेत मुलींची संख्या वाढू लागली. विद्यार्थ्यांची  गळती  थांबावी  म्हणून  त्यांनी  “प्रोत्साहन  भत्ता ” आणि  “आवडेल  ते  शिक्षण ” अशा  अभिनव  कल्पना  राबवल्या . अभिरुची  संवर्धन  , चारित्र्याची  जडण -घडण  यावर  या  शाळातून  भर  दिला  जाई . सरकारी  शाळांपेक्षा  या  शाळांची  संख्या  म्हणूनच  १०  पटींनी  अधिक  होती .  शिवाय  परीक्षांमध्ये  हि  फुले  यांच्या  शाळेतील  मुळीच  पुढे  होत्या. अनंत अडचणी, सामाजिक प्रतिकुलता, आर्थिक चणचण अशा अनेक संकटांवर मात करीत १८४८ ते १८५२ या अवघ्या चार वर्षात या दांपत्याने पुणे, सातारा जिल्ह्यात एकूण १८ शाळा काढल्या. स्त्रीया आणि शुद्र-अतिशुद्रांसाठी शाळा काढण्याचे मुख्य श्रेय महात्मा फुलेंचे असले तरी सावित्रीबाईंचा यात सिंहाचा वाटा होता. यातील काही शाळांमध्ये त्यांनी गरजेनुसार अध्यापनाचे कार्यही केले, म्हणूनच  आद्य भारतीय  शिक्षिका  व मुख्याध्यापिका म्हणून  त्यांचे  नाव  घेतले  जाते. फुले   दाम्पत्याच्या    या  महान  कार्याची  दखल  घेऊन  १८५२ मध्ये ब्रिटीश सरकारकडून विश्रामबाग वाड्यात फुले दांपत्याचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी जोतिबासावित्रीबाईस म्हणाले, ‘हा गौरव तुझाच गौरव आहे. मी शाळा स्थापण्यास कारणमात्र आहे. पण त्या शाळा तु अनेक संकटांशी तोंड देवून यशस्वीरित्या चालविल्यास त्याचा मला खुप अभिमान आहे’.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रात काम करणे, स्त्रियांचा आत्मविश्‍वास वाढविणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईनी ओळखले. तत्कालीन अनेक क्रुर रुढी व परंपरांना त्यांनी आळा घातला. आपल्या घरची पाण्याची विहिर शुद्र-अतिशुद्रांना खुली केली. व्रतवैकल्ये, कुलधर्म व कुलाचार, केशवपन, सतीची चाल, बालविवाह, विषमविवाह या नरकातून स्त्रीला बाहेर काढणे म्हणजे पूर्वेचा सूर्य पश्‍चिमेला उगवणे असाच प्रकार होता पण फुले दंपतीने अशक्य ते शक्य करुन दाखविले. नाभिक समाजाचा संप घडविणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा अशी कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. लहानपणीच लग्न झालेल्या अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. एखादी बालिका विधवा झाली की तिचे मंगळसूत्र तोडून, कुंकू पुसले जाई, डोकीवरचे केस कापून तिला विद्रुप केले जाई, ती चिमुरडी गुरासारखी ओरडत असे. एखादी विधवा बालिका केशवपन करण्याआधी मरण पावली तरी तिचे केशवपन केल्याशिवाय तिला अग्निडाग देत नसत. या दुष्ट चालिविरुध्द काहीतरी केलेच पाहिजे असा सावित्रीबाईंनी विचार केला. जोतिबांच्या मदतीने मुंबई पुणे येथील न्हाव्यांची सभा घेउन विधवा स्त्रियांचे विशेषतः मेलेल्या विधवांचे केशवपन करणे हे कसे अघोरी कृत्य आहे हे पटवून दिले. हे सर्व पटल्यामुळे भट भिक्षुकांच्या त्या कृत्याचा निषेध म्हणून त्यांनी संप केला. यामुळे केशवपन चालीस पायबंद बसण्यास मदत झाली.
दीन, दलित व निराधार स्त्रियांसाठी सावित्रीबाईंनी उद्योग व्यवसाय सुरु केले. स्वावलंबीपणे व स्वाभिमानाने जीवन जगता यावे यासाठी ही योजना होती, पोटाची भूक भागवण्यासाठी लाचारी, लाचारीतून गुलामगिरी, गुलामगिरीतून अत्याचार हे दुष्ट चक्र त्यांनी फोडून टाकले. तरुण पुरुषाची पत्नी मृत झाल्यास किंवा ती जिवंत असतांनासुध्दा त्याला एकापेक्षा अधिक बायका करण्याची पुर्ण मोकळीक पण बालविधवांना मात्र नरकवास. यामुळे बर्‍याचदा तरुण बालविधवा वाट चुकतात, तर काही वेळा विरोधाचा अधिकार ही नसल्याने त्या कुणा नराधमाच्या शिकार होतात हे सावित्रीबाईंच्या लक्षात आले. अशा स्त्रिया मग एकतर आत्महत्या किंवा भ्रुणहत्या करीत. यासाठी फुले दांपत्याने ‘बालहत्याप्रतिबंधक गृह’ सुरु केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालविले. स्वतःच्या पोटी मुलबाळ नसले तरी या शेकडो लेकरांची राष्ट्रमाता होण्याचे भाग्य त्यांना लाभले. येथीलच काशिबाई नामक ब्राम्हण महिलेने जन्म दिलेल्या ‘यशवंत’ या मुलाला सावित्रीबार्ईंनी दत्तक घेतले, त्याला शिकविले, डॉक्टर बनविले. त्याचा आंतरजातीय विवाहही  लावून  दिला. ज्याच्या बापाचा पत्ता नाही, ज्याचे फुले दांपत्याशी लौकिकार्थाने नाते नाही त्या मुलाला दत्तक घेवून वारस ठरविण्याचे कार्य म्हणजेच हिन्दूस्थानातील एक अपूर्व, अद्वितीय असे कार्य होते.
‘बालहत्या प्रतिबंधक गृहात’ अनेक विधवा पिडीत स्त्रिया येत. यासाठी सावित्रीबाईंनी ‘विधवा पुनर्विवाह’ घडवून आणणारी सभा स्थापन केली. दर १५ दिवसांनी ही सभा होई. यात हळदीकुंकू समारंभ, रसपान समारंभ, प्रौढ स्त्रियांचे शिक्षण व स्त्रियांचा छळ या विषयांवर चर्चा होई आणि उपाय सूचविले जात. सांघिकरित्या ते अमलात आणण्याचा प्रयत्न केला जाई. सांघिक स्त्री शक्तीशिवाय स्त्रीमुक्ती आंदोलन यशस्वी होणार नाही हे प्रथम या उदाहरणावरुन सावित्रीबाईंनी सांगितले. स्त्री शक्ती जागृत केल्याशिवाय स्त्रीमुक्ती शक्य नाही हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांच्यापासूनच भारतीय स्त्री सार्वजनिक कार्यात अवतरली. त्यांनीच ज्ञानाची कवाडे स्त्रियांना खुली केली. स्त्री आणि पुरुष सर्व दृष्टींनी समान आहेत हे त्यांनीच प्रथम सिध्द करुन दाखविले. म्हणूनच स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या सावित्रीबाई आद्य जनक, प्रेषित व प्रणेत्या ठरतात.
महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. १८७६-७७ साली पडलेल्या दुष्काळात त्यांनी ५२ अन्नछत्रे उघडून अनेकांच्या जेवणाची व्यवस्था केली. दीन दलितांचे प्राण वाचविण्यासाठी अहोरात्र मिळेल तेथून अन्नधान्य जमविले. इंग्रज सरकारला बजावून दुष्काळ निवारण्यासाठी उपाय करण्यास सुचविले. १८९६च्या दुष्काळातही सामान्यांना मदतीचा हात दिला. २८ नोव्हेंबर १८९०ला जोतिबाफुले यांचे निधन झाले. त्यानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा समर्थपणे वाहिली.
आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला. सावित्रीबाई एक बुध्दीमान लेखिका, प्रतिभासंपन्न कवयित्री आणि वक्त्याही होत्या. त्यांचे काव्यफुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हे दोन काव्यसंग्रह प्रसिध्द आहेत. त्याचप्रमाणे मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे व गाणी, जोतिरावांना लिहिलेली पत्रे इत्यादी साहित्यही प्रसिद्थ आहे. जोतिरावांची भाषणे (भाग १ ते ४) स्वतः सावित्रीबाईंनी संपादित केलेली आहेत.
इ.स. १८९६ च्या दुष्काळात माणूसकी विसरून एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणार्‍या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्रय करणार्‍या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. इ.स. १८९६-९७ च्या दरम्यान पुणे व परिसरात प्लेगने धुमाकूळ घातला. कुणालाच माहिती नसणारा हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर इंग्रज सरकारने एक नवीनच उपाय शोधला. रोगी दिसला की, त्याला जबरदस्तीने उचलून नेले जाई व नंतर तो कधीच परत येत नसे. तो मेला की त्याला मारले गेले, काहीच कळत नसे. लोकांचे हे हाल सावित्रीबाईंना सहन झाले नाहीत. त्यांनी प्लेगपीडीतांसाठी ससाणे यांच्या माळावर (पुणे शहराजवळ) हॉस्पिटल सुरू केले. त्या स्वतः रोग्यांना धीर देऊ लागल्या. त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटू लागल्या. कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. या माउलीस प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना स्वतःच्या आयुष्याची फिकीर नव्हती. इतरांच्या जीवनज्योतींना हातांचा आडोसा धरताना सावित्रीबाईंच्या स्वतःच्या हातांना लागलेली धग त्यांना जाणवली नाही. एका प्लेग झालेल्या हरीजन मुलाला खांद्यावरुन दवाखान्यात आणत असतांना त्यांना ही प्लेगचा प्रादुर्भाव झाला. स्त्री उद्धाराकरीता आपले आयुष्य चंदनासारखे झिजविणारी, भारतीय स्त्रीला तिच्या अस्तित्वाची, सामर्थ्याची जाणिव करुन देणारी, धगधगत्या चितेवर जिवंत स्त्रीचा देह जाळून टाकणार्‍या समाजाला मानवतेचा मंत्र देणारी, अक्षरांच्या साथीने स्वातंत्र्याच्या सूर्याला माथ्यावर कोरणारी, महात्मा जोतिरावांसारख्या महान सुधारकाचा आधार होणारी ही दिव्य ज्योत १० मार्च १८९७ला अनंतात विलीन झाली. असामान्य जीवन जगणारी ही ज्ञानगंगोत्री अखेर सामान्यांच्या प्रवाहात त्यांच्यासारखीच होऊन, त्यांच्यासाठीच विलीन झाली.
आज  सभोवताली  नजर  टाकलीत  तर  स्त्रियांनी  सर्वच  क्षेत्रात  आपली  क्षमता  सिद्ध  करून  दाखविली  आहे.  त्या  पुरुषांच्या  बरोबरीनेच  नव्हे  तर  दोन  पावले  पुढे  राहून  काम  करताना  दिसतात. ही  कमाल  केली  आहे दूरदृष्टीच्या   जोतिबा आणि  सावित्रीबाई   फुले  यांनी! एस. टी. कंडक्टरपासून ते अंतराळ यात्रीपर्यंत आत्मविश्र्वासानं वाटचाल करणार्‍या स्त्रीशक्तीच्या आजच्या बहुतांशी सुखावह  झालेल्या जगण्यामागे सावित्रीबाईंच्या त्यागाचा इतिहास आहे. वाईट ते टाकून देऊन प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार मिळावा ही सज्जनांची धडपड असते. त्यासाठी स्वतःच्या घराची, आयुष्याची पडझड झाली तरी त्यांना त्याची तमा नसते. ज्योती-सावित्री हे याच न्यायानं समाजाच्या कल्याणासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करून अखंड धडपडत राहिले.
मात्र, आजच्या बहुसंख्य भारतीय स्त्रियांना आपल्यासाठी आयुष्य झिजवलेल्या ह्या कर्मयोग्यांचे स्मरणही राहिलेले नाही. मार्गशिर्शातले गुरुवार, नवरात्रितले नऊरंगी नऊ दिवस, हरतालीका वटपोर्णिमेसारखी व्रते वैकल्ये आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या आणि पाळणाऱ्या आजच्या शिक्षीत, उच्चं शिक्षीत उच्चपदस्त महिलांपैकी किती जणिंना सावित्रीबाईंची जयंती वा स्मृती दिन लक्षात असतो? सरस्वती ही विद्येची देवता मानून आजही सर्व बहूजन समाज तिची पूजा करतो. पण, खरतर दररोजच जिचे स्मरण करून तिच्या जीवनकार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहीजे त्या सावित्रीमाईची कृतज्ञतापुर्वक आठवणही आपल्यातील बहुसंख्यांना होत नाही. आणि हो, ही आठवण केवळ महिलांनाच का व्हावी? तद्कालीन क्षुद्रातीक्षूद्र आणि बहूजन समाजातील पुरुषांनाही धर्मग्रंथांच्या थोतांडाने ज्ञानार्जनाचा अधीकार नाकारला होता त्या सर्वांनाच जोतीबांच्या बरोबरीने सावित्रीमाईंनीही ज्ञानार्जनाचा अधीकार मिळवून दिला आणि त्यांच्यातला माणूस जागा केला. मात्र आपण त्यांच्या प्रतिमांचे आपल्या देव्हाऱ्यात पुजन करतो ज्या सरस्वती, लक्षुमी आदी देवतांच्या मानवी कल्याणार्थ केलेल्या कर्तृत्वाचे कोणतेही पुरावे इतिहासात उपलब्ध नाहीत. कुणितरी कधितरी लिहिलेल्या पोथ्या-पुराणांतील भाकडकथा वाचून आपण त्यांची तना-धनाने पूजा करतो, त्यांच्या त्या कल्पीत चरित्रांची पारायणेही करतो. पण, आपल्यासारख्याच एका सामान्य स्त्रीने केवळ स्त्री जातीच्याच नव्हे तर सकल मानव जातीच्या कल्याणार्थ आपले अवघे जीवन खर्ची घातले आणि जे इतिहासाने सबळव पुराव्यांनिशी आपणासमोर ठेवले त्या सावित्रीमाईचे साधे स्मरणही आपल्याला होत नाही.
हळदि-कुंकवाचे सोहळे साजरे करणाऱ्या महिलामंडळांना सावित्रीमाईंची जयंती साजरी कराविशी का वाटत नाही. शाळा-महाविद्यालयांत नाहीनाही ते दिवस उथळ उत्साहाने साजरे केले जातात पण, ज्या महापुरूषांनी आपणासाठी शिक्षणाचे दर्वाजे खुले केले त्यांच्या जयंत्या साजऱ्या कराव्यात असे आपणाला का वाटत नाही? सावित्रीमाईंचे कार्यकर्तृत्व, चरित्र मुला-मुलींपरयंत नेण्याच्या दृष्टिने अशा दिवशी विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, वक्तृत्व, चरित्र व्याख्यान किंवा सुशमा देशपांडे जो एकपात्री प्रयोग करतात त्याचे आयोजन, सावित्रीमाईंच्या कवितांचे वाचन असं बरच काही शिक्षणसंस्थांना करता येण्यासारखं आहे. आजच्या खाऊजा धोरणाच्या परिणामांतून बहूजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे अनेक  मोठे प्रश्न उभे ठाकले आहेत. बदलत्या समाजजीवनात स्त्रियांपुढेही अनेक नवे प्रश्न आ वासून उभे आहेत. अजूनही भारतातील अनेक महिला मध्ययुगीन अपमानीत जीणच जगत आहेत. सावित्रीमाईंच्या कार्यकरतृत्वातून आणि विचारांच्या चिंतनातून या साऱ्या परिस्थितीवर  उत्तरे शोधता येऊ शकतील. पण, त्यासाठी समाजात विचारमंथन होणे गरजेचे आहे आणि अशी अव्चित्ते साधून ते घडवूनही आणले जायला हवे आहे. मात्र, खुद्दं सावित्रीमाईंचाच ज्या समाजाला विसर पडला आहे त्याची त्यांच्या विचारांशी  किती बांधिलकी असणार?