सातत्यानं गेली ७ वर्ष अंदमानला जातोय. कालही गेलो होतो. तिथे सेल्युलर जेलमधे जातो. सावरकरांवर बोलतो.

तिथे अनेक राज्यांतून लोक येतात. त्यांच्या बरोबर गाईड असतो. काल मीही सेल्युलर जेलमधे होतो. तेव्हा गाईड काय सांगतो ते मुद्दामहुन ऐकलं.

गाईड – देखे, यहाँ गोरे लोगोंने कैदीयोंको रखा था. यहा ऊनको अलग अलग सजा दी जाती थी. अब देखो और एक घंटे में वापस आना है.

पर्यटक – लेकीन वो सावरकर कहाँ करते थे?

गाईड – हा वो सावरकर को दुसरे मालेे पे रखा था. अब समय कम है जल्दी वापस आओ.

बास.. एवढीच माहिती. कैदी म्हणजे काय? ते चोर दरोडेखोर असे कोणी गुन्हेगार होते का? तर नाही. ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरादाराची राख रांगोळी करुन आयुष्याचा त्याग करुन देशाला समर्पित करणारे देशभक्त, क्रांतीकारक होते.

मी माझ्या सोबतच्या लोकांना कोठडीत तासभर बसवलं. त्यांना कल्पना करायला सांगीतली की एका तासात एवढा त्रास झाला. २४ तासाचा एक दिवस ३० दिवसांचा एक महिना. १२ महिन्यांचं एक वर्ष. अशी ११ वर्ष सावरकर त्या ७ फुट बाय ११ फुटाच्या कोठडीत संपुर्ण बेड्या घातलेल्या अवस्थेत कसे राहीले असतील? तीथल्या यातना. कोलु, काथ्या कुटणं, हातातुन ढुंगणातुन रक्त पडायच. अन्नामधे किडे सापडायचे. कोठडीत पाली, सरडे, किडे यायचे. अशी ११ वर्षे. बॅरीस्टर झालेला माणुस केवळ देशासाठी कसा राहीला असेल?

मग सर्वांच्या डोळ्यातून अश्रु वहायला लागले. बाकीचे पर्यटक केवळ कैद्यांची कोठडी ब्रिटिश काळातली एवढ्यावरच थांबले. त्यातली धग, यातना, वेदना त्यांना कळल्याच नाहीत. कसे सावरकर व समकालीन क्रांतीकारक कळणार? मी तरी कोणाकोणाला सांगणार? शक्य नव्हतं.

मन विषण्ण झालं. परतीच्या प्रवासात सगळे विचार सुरु झाले, की का सरकार तर्फे चांगली माहिती देणारे तिथे ठेवले जात नाहीत? का क्रांतीकारकांबद्दल ईतकी अनास्था? का का का?

पुढच्या पिढ्यांना कसे कळणार की गांधी नेहरु व्यतिरीक्त हजारो देशभक्त होऊन गेले. त्यांचाही वाटा स्वातंत्र्य मिळविण्यात सिंहाचा आहे! शालेय पुस्तकातुन तर सगळाच शौर्याचा ईतिहास वगळून टाकलाय. कसे शिवाजी, संभाजी, भगतसिंग, सावरकर जन्माला येणार? कसं होणार भारताचं? चिंता लागून राहते.

मग अस काहीतरी लिहून मनातले विचार तुमच्या बरोबर वाटतो.

– शरद पोंक्षे.