सफाळे – भाग १

        सोनसळी ऊन  तांबूस गवताच्या पात्यांतून पाणथळ जमिनीवर उतरतं. खाजणातून वाहत येणारा भरारा वारा डोंगरांना आपटून करवाळे धरणासमोरच्या पाणथळ खाऱ्या जमिनीवर पसरतो. तांदुळवाडी कड्यांनी दोन्ही हात नवघर आणि कांदरे-भुरे पर्यंत पसरवून सफाळे गावाला अलिंगनात कायमचे बद्ध केलेले ! वैतरणा स्टेशनहून सुटलेली रेल्वेगाडी वालुतळ्याजवळ आली कि असा चित्रमय निसर्ग एका क्षणात प्रवाशाला भुरळ पाडतो. सफाळ्याची पहिली ओळख हि अशी होते.

        उंबरपाडा , सफाळे गांव या दोन्हींना एक सफाळे होता आलं ते पश्चिम रेल्वेने उंबरपाडा येथे ब्रिटिशकाळात सुरु केलेल्या रेल्वेस्थानकामुळे. आज पंचक्रोशीतील वीस वीस किलोमीटर परिघातील साठ ते सत्तर गावपाडे या रेल्वेस्थानकामुळे जोडले गेले. उंबरपाडा-सफाळे गाव-सरतोडी-कर्दळ-माकणे-रोडखड असा पाड्यांचा एक गुच्छ होऊन सफाळे तयार झाले!

        दसागरी, मिठागरी, खार पाटील, कुणबी, वाडवळ आणि आदिवासी या समाजांचे पहिल्यापासूनच आधिक्य असलेले सफाळे आज अठरापगड जाती जमाती आणि धर्मांचे आश्रयस्थान झाले आहे. मुंबईचं एक उपनगर झाले आहे.

        कृषिआधारीत संस्कृती बदलून नोकरी आधारित होत आहे ! सत्तर टक्के सफाळकर मुंबई नाहीतर डहाणू पर्यंतच्या रोज वाऱ्या करतात. अप- डाउन म्हणजे त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग! काहींची पाच, काहींची दहा, काही पंधरा- वीस-तीस…अगदी पन्नास वर्ष मुंबईला अप-डाउन करणारे माझ्याशी बोलतात, तेव्हा वाटतं कि जर हि रेल्वे नसती तर..?
सकाळी लोकशक्तीला किंवा वलसाड ला गेलेला माणूस रात्री पुन्हा वलसाडने येतो कि शटलने यावर तो मध्यमवर्गीय आहे, उच्चमध्यमवर्गीय आहे कि struggler आहे इत्यादी status ठरवलं जातं अशी अफवा आहे…! त्याला मुलगी देतानाही सासरकडचे मुलाच्या किंवा मुलीच्याही, हेच प्रश्न विचारतात…!

असो.
        मी एका ठिकाणी माझ्या interview साठी गेलो होतो. तिथे समोर बसलेल्या officerने माझ्या नितळ चष्मेधारी चेहऱ्याला आणि हळू आवाजाला आश्चर्याने पाहत विचारले, अरे सफाळे म्हणजे रेल्वेत चढतांना मुजोर मारामारी करणारे, reservation करून बसलेल्यांना उठवणारे असं ऐकलं होतं. तू नक्की सफाळ्यातूनच आलायस ना.?!!

        सफाळकर रेल्वेगाडी अन अप – डाऊनच्या या चक्राला मुकाट्याने सहन करीत वर्षानुवर्षे गैरसोयिंकडे कानाडोळा करीत हसत खेळत प्रवास करतोय. आधी रेल्वे गैरव्यवस्थेविरुद्ध आंदोलने करून तडफदार आवाज उठवणारी सफाळ्यातील  पिढी थोडी पाठी पडलीय.

        अगदी पहाटे दोन वाजता सफाळ्यात काकडी, मेथी,पालक,दुधी, टोमॅटो, वांगी,मिरची, शिराळं, गलकं, कोथिंबीर, भेंडा, शेगटाच्या शेंगा-  (sorry sorry ‘ हेगटाह्या हेंगा’!) इत्यादी अनेक भाज्यांचा ,फुलांचा व्यापार सुरू होतो..त्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे रेल्वेत टेम्पोत टाकून मुंबई आणि इतर शहरात रवाना होतात.

        त्यानंतर सकाळच्या ठराविक गाड्यांना जाण्यासाठी जो तो स्टेशनवर येतो. अर्धी अधिक पंचक्रोशी गावातून गेल्यावर गावातली दुकानं हळुहळू उघडू लागतात. परिसरातील माणसांना एकच मोठी बाजारपेठ असल्याने गावरहाटीला लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी गर्दी होऊ लागते.
        आणि संध्याकाळ नंतर जशी एकेक रेल्वे येऊ लागते, माणसांचा ओघ पुन्हा रस्त्यावर वाहू लागतो..उणीपुरी पाचशे -सहाशे मीटर लांब, सफाळ्याची मुख्य बाजारपेठ !

        गावात सुसज्ज हॉस्पिटल नसल्याने नागरिकांची गैरसोय होते..अडलेली बाळंतीण,पडलेला माणूस सगळ्यांची रवानगी विरारकडे नाहीतर पालघर..! तरी सफाळकर बिनधास्त ! डॉ. विलास पोसम सरांनी खूप आधीपासून चालविलेल्या सेवायज्ञाचे आल्हाद हॉस्पिटल हा एक आधार आहे . माझा जन्मही इथलाच. ग्रामीण भागात इतके वर्ष अखंडित रुग्णसेवा करण्यासाठी विचार पक्के लागतात..! अशी मोजकी रुग्णालये सफाळ्यात आहेत.

        खून- मारामाऱ्या-दरोडे – अपहरण-चोरी इत्यादी प्रकार जसे इतर भागात सर्रास चालतात तसे सफाळ्यात मात्र नाही. एखादी अशी घटना घडली कि सफाळकर वर्षानुवर्षं तिची आठवण सांगतात! 
सफाळकरांना जितका ताठा आहे, जितकं शहाणपण आहे तितकंच नवीन स्वीकारायची ओढ आहे, समज आहे. चित्रकला,स्थापत्यकला, सुतारकाम यांसारखे कला जोपासणारे कलाकार सफाळ्यात पिढ्यानुपिढ्या आहेत. सफाळ्याच्या माणसाला अरे ला का रे करता येतं. म्हणूनकाही सफाळकर उद्धट नाही म्हणता येणार पण थोडे शिष्ट जरूर आहेत! लगेच ओळख करून आपुलकीने मिसळणारे नसले तरी एकदा नीट ओळख झाली कि मात्र पाहुणचाराला सीमा नसते! सफाळ्याला गाव म्हणून एक विशिष्ट संस्कृती नाही , पण संस्कृतीच्या नावाखाली इतर गावात जी बजबजपुरी असते ती इथे नाही. सफाळे तसं शांत आहे, निवांत आहे.

        माटुंगा, वडाळा मुंबईच्या ह्या हृदयातून खूप अस्वच्छ हवा फुफ्फुसात भरून घेतली कि संध्याकाळी तांदुळवाडीच्या किल्ल्यावरून येणारा भरारा वारा सगळा चिकटा काढून टाकतो! सफाळ्याच्या घाटात पसरलेल्या जंगलात ऑक्सिजनचं एक वादळ राहतं.. इथल्या आदिवासी बांधवांनी ह्या दाट अरण्यात पन्नास साठ वर्षांपूर्वीपर्यंत सालंकार वनदेवी दिसायची अशा कथाहि मला सांगितल्या…ह्या वनदेवतेचा आशिर्वाद म्हणून कि काय, आजही सफाळे त्याचे हिरवेपण बरेचसे टिकवून आहे.

        स्वतःच्या धर्माचं, जातीचं, परंपरांचं , रुढींचं एक मोठं गाठोडं घेऊन जगत असतात सगळेच…त्यात गावच्या भूगोलाचं महत्वही तितकंच…
तसंहि खूप एकटे -खूपच एकटे असतात सगळे..त्यांना वाटतं कि सारेच तर आहेत बरोबर..पण त्या मृत्यूच्या एका क्षणाची शेवटची जाणीव होईपर्यंत….खूप एकटे असतो आपण….जवळची वाटणारी पिलावळ स्वार्थासाठी जवळ आलेली..थोडंसं खुट्ट झालं कि हात सोडणारी..
या एकाकीपणात माणसाला ओढ लावते ते त्याचे मूळ..ह्या मुळाला त्याने जन्म दिला म्हणून आनंद द्यायला जगत असतो आपण..
        ह्या मुळाच्या शोधात निघाल्यावर दोनच गोष्टी मिळतात..आईची कूस आणि जन्मगावाची वेस…म्हणून तर यायचं असं परत..नाहीतर हे विश्व तुम्हाला फिरायला आहेच कि…ह्या दोघांत आशेचा प्रकाश..
बाकी सगळा अंधार ..शांत थंड निर्जीव अंधार…

~~विश्वजीत काळे, सफाळे.
PC – Alhad Posam