विक्रमादित्य पुन्हा वेताळाचा पाठलाग करत स्मशानात पोचला.  झाडावरील प्रेत  उतरून  घेतले आणि ते पाठीवर घेवून उज्जैन नगरीकडे निघाला.कांही अंतर चालून गेल्यावर विक्रमादित्याच्या कानी वेताळाचा आवाज पुन्हा कानावर पडला!
“ विक्रम उज्जैन अजून खूप दूर आहे, तिथे जाईपर्यंत मी तुला महाभारतातील  कुरूक्षेत्रावरील एक घटना तथा कथा सांगतो……

” विक्रमा, तुला महाभारत माहीत असेलच. पण कुरुक्षेत्रावर अर्जून हाच सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून नावाजलेला होता, पण त्यालाही एकदा एका प्रसंगात पराभूत व्हावे लागले होते. इंद्राकडून प्राप्त केलेल्या शस्त्र आणि अस्त्रांच्या जोरावर अतिशय शक्तीशाली बनलेल्या अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर प्रत्यक्ष महाबली हणुमान विराजमान होते. असा त्याचा सर्व शक्तीशाली रथ एकदम सर्वश्रेष्ठ धनुर्धर असणा-या महावीर कर्णाच्या रथासमोर येवून थांबला. या युद्धभूमीत ते प्रथमच दोघे एकमेकांसमोर आले होते. कर्ण दिसताच अर्जुनाने गांडीव हातात धरून धनुष्याची प्रत्यंचा खेचली आणि टणत्कार  केला. एकदम आकाशात विजांचा कडकडाट व्हावा असा आवाज निर्माण झाला.

प्रत्यूत्तर म्हणून कर्णानेही त्याच्या विजयधनुष्याची प्रत्यंचा खेचली तेंव्हा  असाच टणत्कार ऐकायला मिळाला. अर्जूनाला हा टणत्कार ऐकून कर्णाबद्दल मनात प्रचंड मत्सर झाला आणि त्याची उन्मादी वृत्ती जागी झाली. हा मत्सर निव्वळ प्रतिस्पर्धी योद्धा म्हणून नव्हेतर स्वत: सर्वश्रेष्ठ धर्नुधर असल्यांच्या अहंकारातून तो निर्माण झाला होता. तो क्रोधीत झाला आणि या क्रोधातच अर्जुनाने भात्यातून बाण काढला आणि कर्णाच्या रथावर असा कांही मारला की कर्णाचा रथ ८ गज मागे सरकला गेला. कर्णाचा रथ मागे सरकताच अर्जूनाने अहंकाराने सर्वत्र विजय मुद्रेने पाहीले. तेवढ्यात कर्णानेही अर्जूनाच्या रथावर असा कांही  बाण मारला की, अर्जुनाचा रथ ४ गज मागे सरकला !

सारथी श्रीकृष्ण, हे पाहून म्हणाले  “ वा … कर्ण वा……”

अर्जुनाने एकदम आश्चर्यचकित होवून श्रीकृष्णाकडे पहिले, पण श्रीकृष्णाच्या या कृतीने त्याचा अहंकार आणखी वाढला! तो अधिक क्रोधित झाला. त्याने पुन्हा कर्णाच्या रथावर बाण मारून कर्णाचा रथ १० गज मागे रेटला आणि श्रीकृष्णाकडे विजयी मुद्रेत पुन्हा कटाक्ष टाकला! श्रीकृष्ण शांतच होते!  कर्णानेही अर्जूनाच्या रथावर बाण मारून अर्जुनाचा रथ, पुन्हा ५ गज मागे रेटला !

श्रीकृष्ण पुन्हा म्हणाले ” वा ..कर्ण वाह… तु खरोखर महावीर आहेस, तुला वंदन  ”

श्रीकृष्णाकडून कर्णाच्या धनुर्विद्येचे हे कौतुक ऐकून अर्जुन अत्यंत रागावला. त्याच्या मनात कर्णाबद्दल अतिशय द्वेष निर्माण झाला, स्वत:च्या विराट आणि विशाल अशा सामर्थ्याबद्दल त्याच्या मनात अहंकार आणि दंभ निर्माण झाला. तेवढ्यात कर्णाच्या विजयधनुष्याच्या एका बाणाने अर्जुनाच्या गांडिवाची प्रत्यंचाच तोडली. खरेतर अर्जून प्रत्यंचा पुन्हा तात्काळ बांधण्यात निपुण होता पण त्यास त्या प्रसंगी शक्य झाले नाही. अर्जून कर्णासमोर एक क्षण अक्षरश: निशस्त्र झाला! पण गांडीव त्याच्या हातात होता हे पाहून कर्णाने  पुढचा बाण भात्यातून काढला आणि प्रत्यंचेवर चढवणावर एवढ्यात सूर्यास्त झाला आणि शंखनाद त्याच्या कानावर पडला! कर्णाने तो बाण पुन्हा भात्यात ठेवला आणि नियमानुसार तो रथ वळवून आपल्या शिबीराकडे निघून गेला!

अर्जून तिथेच कांही क्षण स्तब्ध झाला आणि
तो भानावर आला, श्रीकृष्णाने रथ वळवल्यावरच!

शिबिरात अर्जून निशब्दच होता आणि अस्वस्थच होता. रात्री युद्धशिबीरात चर्चा करत असताना, न राहून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला “ आज,  मी कर्णाचा रथ एकदा ८ आणि पुन्हा १० गज मागे रेटला ,पण वासूदेव आपण माझे कौतुक केले नाही, मात्र कर्णाने केवळ एकदा ४ गज आणि पुन्हा ५ गज माझा रथ मागे रेटला तर त्याचे तुम्हांस कौतुक वाटले!  हे वासुदेव याचे कारण मला अद्याप समजले नाही, म्हणून मी अस्वस्थ आहे ” श्रीकृष्णाने अर्जूनाकडे पाहीले आणि हसतहसत त्यास उपदेश केला आणि त्याच्या प्रश्नाचे उत्तरही दिले! श्रीकृष्णाचे उत्तर ऐकून अर्जून खजील झाला. अर्जूनाने आपली चुक मान्य करून श्रीकृष्णाची क्षमा मागीतली आणि अत्यंत विनयपुर्वक व नम्रपणे कर्ण हा खरोखर सर्वश्रेष्ठ धनुर्धर तथा  महावीर असल्याचे मान्य करून, त्यास प्रणाम केला”

एवढे बोलून वेताळ विक्रमास म्हणाला ” विक्रमा, अर्जूनाचा सारथी श्रीकृष्ण असताना सुद्धा त्याने अर्जूनाचा कर्णाने मागे रेटल्यावर कर्णाचे का कौतुक केले? अर्जूनाने क्षमा मागून, कर्णास महावीर म्हणून वंदन का केले? अर्जूनाची नेमकी चुक काय होती?

विक्रम शांतच होता! ……. “विक्रमा, माझ्या प्रश्नाचे उत्तर दे, अन्यथा तुझ्या मस्तकाच्या ठिक-या ठिक-या उडतील? ” वेताळ कडाडला!

विक्रम उत्तरला ” वेताळा अर्जुन सर्व शस्त्र व अस्त्रांनी सज्ज होता! पण त्याच्या मनात त्याच्या शक्तीचा वृथाभिमान भरलेला होता. स्वक्षमतेबद्दल अहंकार व उन्माद होता. अर्जूनाच्या रथावर सारथी म्हणून प्रत्यक्ष
सुदर्शनचक्रधारी श्रीकृष्ण होते आणि रथाच्या ध्वजावर प्रत्यक्ष महाबली हनुमान विराजमान होते. जगातील सर्वात शक्तिशाली अशा अस्त्र शस्त्रानी सुसज्ज असतानाही कर्णाने त्याचा  रथ एकवेळ  ४ आणि पुन्हा  ५ गज मागे रेटला होता ! म्हणजे कर्णाच्या क्षमतेची आणि सामर्थ्याची कल्पना येऊ शकते, जी केवळ श्रीकृष्णाने ओळखली होती.  शिवाय त्यावेळी कर्ण या क्षमतेचा अहंकार, दंभ न बाळगता निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडत होता! म्हणून श्रीकृष्णांनी कर्णाचे  कौतुक करून त्याचा महावीर व  सर्वश्रेष्ठ धनुर्धर असा गौरव केला. दंभ, अहंकार, द्वेष, मत्सर आणि असूया त्यागण्याचा उपदेश श्रीकृष्णाने अर्जूनास केला, आणि त्याने या अवगुणांना त्यागून पुढील वाटचाल केली म्हणूनच कर्णाबरोबर तोही सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून इतिहासात ओळखला गेला कारण त्याने अहंकार त्यागला! विनम्रता अंगीकारली आणि स्वत:च्या ह्रदयातील  कुरूक्षेत्रावर मनातील अहंकाराच्या विरोधातील युद्ध विनयाने जिंकले,  तेंव्हाच त्याची क्षमता सत्कारणी लागली ”

” विक्रमा,  तुझ्या उत्तराने मी प्रसन्न झालो! अहंकार, द्वेष, मत्सर, दंभ यांना उराशी कवटाळत कधीही कोणी महावीर होऊ शकत नाही. अर्जूनाने चुक कबुल केली म्हणूनच तो इतिहासात अजरामर ठरला, पण प्रत्येकास हे समजत नाही .म्हणूनच कित्येक जण युद्ध जिंकूनही अर्जूनाप्रमाणे गौरवास पात्र ठरत नाहीत, इतिहास अशांची दखलही  घेत नाही. ते अहंकाराचे व उन्मत्तेचे प्रतिक बनून इतिहासात ओळखले जातात!   ….पण विक्रमा, तुझे मौन संपले मी निघालो “