सुखी वैवाहिक जीवनासाठी….👍

किंग आर्थर नावाचा एक राजा होता. एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या राज्यातील राजाने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करून तुरुंगात बंदिस्त केले. पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मतपरिवर्तन झाले आणि त्याने आर्थरला जीवदान द्यायचे ठरवले.

पण त्यासाठी त्याने आर्थर समोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो आर्थरला एक प्रश्न विचारेल आणि त्याचे उत्तर देण्यासाठी वर्षभरासाठी मुक्त करेल. त्या वर्षभरात आर्थर त्याचे उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्युदंड.

तर तो प्रश्न होता की…..
” स्त्रियांना नेमके काय पाहिजे ? ”

या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भल्या भल्यांनी हात टेकले होते, तर तरुण आर्थरकडून हे उत्तर शोधले जाणे म्हणजे चमत्कारच ठरला असता. पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वतःच्या राज्यात परतला.

तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली. त्यात त्याची राणी, नावाजलेले विद्वान, दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राजविदुषकाचे ही मत घेतले. पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.

मग काही जणांनी सुचवले की राज्याच्या बाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट, तिच्याशी सल्लामसलत कर. ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल. पण तिचा सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.

हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले.

चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून घेतला व धूर्तपणे उत्तरली, “मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्णा करावी लागेल; तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न करावे लागेल.”

सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन व्यक्तिमत्त्व व शूर
योद्धा अशी होती.

तिची हि मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला. ती चेटकीण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरूप होती. तिच्या मुखात केवळ एकच सुळा होता. तिच्या कंठातून चित्रविचित्र आवाज येत राहायचे व ति जिथे जाईल तिथे दुर्गंध पसरायचा.

आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे नव्हते.

पण लॅन्सलॉटला जेव्हा हे कळले त्याने तडक चेटकिणीची मागणी पूर्ण करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला. तो म्हणाला माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा त्याग काहीच नाही. नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य केले. लॅनस्लॉट व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली.

तेव्हा चेटकिणीने आर्थरचा जीव वाचवणारे उत्तर दिले की….

” स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो ”

हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एक महान सत्य उघड केले आहे.

शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनांतून मुक्त केले. या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.

विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरतच लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मंचकावर चेटकिणीऐवजी एक अतिसुंदर रूपगर्विता तरुणी बसली होती. धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की हा बदल कसा काय झाला ?

त्यावर ती म्हणाली की, मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी चेटकीणीच्या रूपात राहीन आणि उरलेला अर्धा काळ या सुंदर व तरुण रूपात.

आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रूपात
राहायचे अन कोणत्या वेळी या रूपात राहायचे हे तुला ठरवायचे आहे.

यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुद्ध पर्यायांमुळे विचारांचे द्वंद्व सुरू झाले. दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पत्नी म्हणून मिरवता येईल. पण रात्री एकांतात काय ? अन त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल ?

आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता ?तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉटचे उत्तर वाचा.

कुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला की, आजपासून जरी तू माझी पत्नी असली तरी केव्हा कसे राहायचे हे ठरविण्याचा हक्क पूर्णपणे तुझाच आहे. तुला जेव्हा जसे आवडेल तेव्हा तू तशी राहा. माझी कसलीही हरकत राहणार नाही.

हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर प्रचंड खूष झाली व तिने त्याला वचन दिले की ती चेटकिणीच्या रूपाचा कायमचा त्याग करेन. कारण लॅनस्लॉटने तिला आदराने वागवले व तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क तिला दिला.
.
.
.
.
तात्पर्य :
” बायकोला मनाप्रमाणे वागू द्या,
नाहीतर गाठ चेटकीणीशी आहे “