*अमेरिकेत वास्तव्य असलेल्या एका भारतीय महिलेचा अनुभव -*

       त्यांनी त्यांच्या लहान मुलाला शाळेत घातलं होतं. परिक्षेचे दिवस जवळ आले तरी परिक्षेचं टाईम टेबल नाही, काय अभ्यास करून घ्यायचाय मुलाकडून ते कळवलं नाही.
        त्या घायकुतीला येऊन शाळेतल्या टिचरला भेटल्या. टिचरने शांतपणे सांगीतलं की मुलाची परीक्षा आहे त्यात पालकांनी लक्ष घालायची गरज नाही. मुलाचा अभ्यास ही आता आमची जबाबदारी आहे. त्याला काय येतं काय नाही हे आम्ही बघू. घरी त्याचा कसलाही अभ्यास घ्यायचा नाही.
         बाईंना हे ऐकून धक्काच बसला. आपल्याकडे मुलांची परीक्षा म्हणजे आई वडीलांचीच परीक्षा असते. त्यांचा क्राफ्टचा घरी करून आणण्यासाठी दिलेला प्रोजेक्ट, काढून आणायला सांगीतलेलं चित्रं हे आई वडीलच पूर्ण करून देतात. शाळांनाही ते चालतं.
        पण अजून धक्का बसणं पूर्ण झालेलं नव्हतंच. परीक्षा कधी विचारल्यावर उत्तर मिळालं की त्यांच्याकडे अशी कुठलीही तारीख किंवा वेळ ठरलेली नसते. वर्ग चालू असतांना एकेका मुलाला दुस-या खोलीत घेऊन जाऊन प्रश्न विचारले जातात. त्यांचा त्यावेळी उत्तर देण्याचा मूड नसला तर परत कधीतरी त्याची परीक्षा घेतली जाते. त्याला कुठल्या विषयात उत्तरं देता येत नाहीत ते बघून त्या विषयाची आवड कशी लागेल, त्याला तो विषय कसा समजेल त्याकडे जास्त लक्ष दिलं जातं.
         हे ऐकून तर त्या बाईंची शुद्ध हरपायचीच बाकी राहीली. त्यांची तर त्यांची पण वाचतांना माझी पण.
        या पुढची घटना तर
आणखीनच थक्क करणारी.
       काही दिवसांनी त्या बाईंनी सांगीतलं की एकदा मुलगा शाळेतून रडवेला होऊन आला. त्याला मित्रांनी चिडवलं होतं, ‘ब्राऊन’ म्हणून. आईवडीलांना पण हा धक्काच होता.
         ते शाळेत गेले. टीचरला भेटले. तिने ऐकून घेतलं आणि त्यांना सांगीतलं की ही तर सुरूवात आहे त्याची जगाशी ओळख होण्याची. त्याची काहीतरी खोटी समजूत घालू नका, कणव वगैरे पण दाखवू नका. त्याला आणि तुम्हालाही ही गोष्ट फेस करायला हवीय. वर्गात काय करायचं ते मी बघते.
         नंतर तिने वर्गातल्या मुलांना किंवा या मुलालाही
त्या घटनेची ओळखही दाखवली नाही. त्यांना रागवली नाही किंवा याला जवळ वगैरे घेऊन समजूत पण घातली नाही… परत कधी असं झालं तरी.
         नंतर उन्हाळ्यातल्या एके दिवशी तिने वर्गातल्या सगळ्या मुलांना साधे कपडे घालून यायला सांगीतलं. खेळाच्या वेळात सगळ्या मुलांना उन्हात कपडे काढून
मैदानावर खेळायला लावलं.
        थोड्याच वेळात मुलांची त्वचा लाल लाल व्हायला लागली. कोणाकोणाला पुरळ आलं. कोणाच्या अंगावर चट्टे उठले.
         या ब्राऊन मुलाला मात्र
कसलाच त्रास झाला नाही. मग त्या मुलांना वर्गात बसवून तिने जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांमधलं हवामान कसं वेगवेगळं असतं आणि त्या हवामानाला साजेशी त्वचा, तिचा रंग निसर्गाने कसा तिथल्या लोकांना दिला आहे ते समजावून सांगीतलं. आणि या ब्राऊन मुलाला निसर्गानेच संरक्षण दिल्याने त्याला उन्हाचा कसा त्रास झाला नाही तेही सांगीतलं.
       सगळेजण कौतुकाने आणि आदराने त्याच्याकडे बघायला लागले. त्याला सुद्धा स्वतःच्या कातडीच्या रंगाचं कौतुक वाटलं. सगळ्यांच्या नजरांनी त्याला स्वतःबद्दल खूप भारी भारी वाटलं. पुन्हा कोणी त्याला रंगावरून चिडवलं नाही.
       हे ऐकल्यावर मला खरंच त्या टिचरचे पाय धरावेसे वाटले. मुलांना ती नुसतं पुस्तकी माहीती, पुस्तकी विद्या शिकवत नव्हती खरोखरच ज्ञानी करत होती. त्यांच्याही नकळत त्यांना माणूस बनवत होती.
       *यालाच म्हणतात रचनावादी शिक्षण. ह्यातून आपण काहीतरी शिकणार आहोत का? विचार करायला काय हरकत आहे?