१४ ऑगस्ट १९४२

इंग्रजांविरोधात ‘चले जाव, करेगें या मरेगें’ अशी मनाशी खूणगाठ बांधून राष्ट्रसेवा दलाचे हजारो तरुण तारापूर, घिवली, वडराई, सातपाटी, शिरगाव, मनोर सफाळा, बोईसर, नांदगाव, मासवण, एडवण, कोरे, टेंभोडे, नंडोरे, माहीम, आलेवाडी, सालवड, नवापूर आदी गावांतील तरुणांचे जत्थेच्या जत्थे घेऊन पालघरला जमा झाल्यानंतर सर्वजण पालघरच्या तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन निघाले होते. मोर्चा दुपारी साडेबाराच्या सुमारास हुतात्मा चौकाजवळ आला असता ब्रिटीश राजवटीतील पोलीस फौजदार आल्मिडा यांनी मोर्चा अडविला. मात्र, मोर्चातील तरुण इंग्रजांविरोधात घोषणाबाजी करत राहिले. एकही तरुण जागचा हलायला तयार होईना. उलट, तो शांत मार्गाने महसूल कचेरीकडे हळूहळू आगेकूच करतच होता. इतक्यात, आल्मिडा यांनी मोर्चावर बेछूट गोळीबार केला. गोळीबारात सातपाटी येथील काशिनाथ हरी पागधरे, नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर, पालघरचे रामप्रसाद भीमशंकर तिवारी, सालवडचे सुकुर गोविंद मोरे व मुरबे येथील रामचंद महादेव चुरी मरण पावले. मात्र, हातातला तिरंगा ध्वज त्यांनी अखेरपर्यंत खाली पडू दिला नाही. तो आपल्या छातीवर झेलून ठेवला. रक्ताने माखलेला हा ध्वज आजही जतन करून ठेवण्यात आला असून दर १४ ऑगस्टला या ध्वजाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात येते. या पाचही हुतात्म्यांचे पालघर शहराच्या चौकात स्मारक बांधण्यात आले आहे.

या हुमात्म्यांना अभिवादन करण्यासाठी १४ ऑगस्ट १९४३ पासून प्रत्येक वषीर् पालघरमधील बाजारपेठा पूर्ण दिवस बंद ठेवल्या जातात. संपूर्ण तालुक्यातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळी, व्यापारी, शेतकरी, विद्याथीर्, लोक प्रतिनिधी, सरकारी अधिकारी हजारोंच्या संख्येने तहसील कार्यालयापासून मूक मिरवणूक काढून आदरांजली वाहण्यासाठी पालघरच्या हुतात्मा चौकात उपस्थित राहतात. हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्याचा पहिला मान स्वातंत्रसैनिक अथवा त्यांच्या पत्नी वा कुटुबियांचा असतो.
देशभरातील तसेच पालघरमधील गोळीबारात जे ५ हुतात्मे झाले त्यांस वंदन व भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐
व्यर्थ न हो बलीदान…
त्याच्या राष्ट्रभक्तीची बलिदानाची जाणिव आमच्यात सदैव तेवत राहु दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏