हर्शद गोविंद जाधव

पप्पा गेले त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात आलेल्या विविध घटना, प्रसंग आणि सण-उत्सवांवेळी पप्पांचं नसणं खूप तीव्रतेने जाणवत राहिलं. पप्पा गेल्यानंतरच्या दोनच दिवसांनी गणेशोत्सव आला होता. पण त्यावेळी त्याचे भान आम्हाला नव्हते. मात्र, यावर्षी गणेशोत्सवाला गावी गेलो तेव्हा पप्पांच्या त्या उत्साही लगबगीच्या स्मृती जाग्या झाल्या.  आपल्या परिचयातील कुणी काहीही विशेष केलं, कशात नैपुण्य मिळवलं, कुठली महत्वाची परिक्षा पास केली तर त्याविषयीचा आपला आनंद पप्पा अगदी मोकळेपणाने व्यक्त करीत आणि आपल्याकडे असलेली वा नसल्यास तातकाळ विकत आणून एखादी छानशी भेटवस्तू त्या व्यक्तीस अगदी प्रेमाने देत. यावर्षी आमच्या गावच्या सार्वजनीक गणेशोत्सवात दहावीपासून ते अगदी पदव्योत्तर पदवी मिळवलेल्या पप्पांच्या पुतण्या-नातवंडांना त्यांच्याच स्मरणार्थ बक्षीसस्वरुपात भेटवस्तू देताना त्यांच्या दातेपणाच्या अशा अनेक आठवणी मनःपटलावर सरकून गेल्या. आणि पप्पांनी आपल्याला काय काय दिलं याचीच एक उजळणी नकळतच मनात होऊन गेली. मला आठवतय् तेव्हापासूनच्या माझ्या जडणघडणीतील पप्पांच्या योगदानाचा विचार करताना आज मला स्वतःलाही खूप काही नव्याने गवसल्यासारखं वाटलं. माझ्या सर्वप्रकारच्या जडणघडणीतील पप्पांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष सहभाग मला नव्याने बरंच काही शिकवून गेला.

मी ३ ४ महिन्यांचा असतानाच मला नीट पाहता येत नसल्याची गोष्ट पप्पांच्या लक्षात आली आणि त्यावेळी सातवीपास असलेल्या माझ्या पप्पांनी कुण्याही बाबा-बुवा-भगताकडे मला न नेता घराजवळ भरलेल्या एका वैद्यकीय नेत्रचिकित्सा शिबिरात नेऊन माझ्या डोळ्यांची तपासणी करवली आणि डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे उपचारही करवले. आपला मुलगा अंध आहे हे सत्य पचवून त्यांनी माझ्या भवितव्याचा सकारात्मक दृष्टीकोनातून विचार सुरू केला आणि अंध मुलांसाठी मुंबईत वेगळी स्वतंत्र शाळा असल्याची माहिती मिळताच वयाच्या अवघ्या साडेचारव्या वर्षी मनावर दगड ठेऊन मला वरळीच्या हॅप्पीहोम शाळेत दाखल केले. माझ्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, केलेलेकष्ट आणि आपल्या तुटपुंजा मिळकतीतही मला काहीही कमी पडू न देण्याची निभावलेली भुमिका मला शब्दांतून सांगता येणे केवळ अशक्यच आहे.

मला ब्रेल लिहिण्यासाठी जाड कागद लागतो हे स्वतःच जाणून घेऊन एरव्ही रद्दीत जाणारे स्टेट बॅंकेचे विविध रिपोर्ट्स मॅग्ज़ीन्स माझ्यासाठी पप्पा घरी आणत असत. तसेच, स्टेश्नरी दुकानांतूनही विविध स्वरुपाचे जाड पेपर शोधून ते माझ्यासाठी घेऊन येत असत. आज मला लागलेल्या लेखनाच्या गोडीचे, चांगल्या लेखनासाठी आवश्यक असलेला लेखन सराव मला सहजपणे करता आल्याचे आणि त्यामुळेच आज मी जेकाही थोडे बरे लिहू शकतो त्या साऱ्याचे श्रेय्य पप्पांनी लहानपणापासून मला केलेल्या या अखंडीत कागदपुरवठ्यात आहे.

तसेच, पप्पांना स्वतःला वाचनाची आवड असल्यामुळे ते बॅंकेच्या वाचनालयातून नेहमीच पुस्तके घरी आणत असत आणि आपण आज कोणते नवे पुस्तक आणले, ते कशाविषयी आहे, कुणी लिहिले आहे इत्यादी माहिती ते स्वतःहूनच मला देत असत. कधी कधी त्यांना खूप आवडलेला वा त्यांना मला वाचून दाखवावासा वाटणारा पुस्तकातील भाग स्वतः आग्रहपुर्वक मला वाचूनही दाखवीत असत. यातूनच माझ्यावर अगदी लहानपणातच वाचनाचे संस्कार झाले. पुढे मग मी स्वतःहूनही अभ्यासासाठीचे किंवा काहीवेळा अन्य साहित्यही पप्पांकडून वाचून घेऊ लागलो आणि तेही त्यात रस घेऊन ते मला वाचून दाखवत असत.

मी अगदी लहान असतानाच केव्हातरी पप्पांनी घरात टेपरेकॉर्डर आणला होता. आणि तेव्हापासूनच त्यांनी तो मला हाताळायलाही दिला होता. म्हणजे, त्यांनी स्वतःच त्यातील प्रत्येक बटणाचे कार्य मला सांगून मी स्वतंत्रपणे ते ऑप्रेट करावे अशी मोकळीकच मला दिली होती. आपला मुलगा अंध आहे तेव्हा तो हे कसे हाताळेल याचा नकारात्मक विचार न करता त्यांनी, मी स्वतः हे हाताळू शकतो, नव्हे तर हाताळलं पाहिजे अशा अत्यंत सकारात्मक भुमिकेतून त्यावेळी मला ते स्वातंत्र्य दिलं असणार असं मला आज त्यासाऱ्याचा विचार करताना जाणवतय. आणि त्यावेळी पप्पांनी नवं यंत्र वा उपकरण हाताळण्याची जी संधी, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास मला दिला त्यामुळेच आज हे नवनवं तंत्रज्ञान सहजपणे आत्मसात करणं मला शक्य झालय्.

याच टेपरेकॉर्डरने मला ऐकण्याची सवय लावली. मग सुरवातीला स्वाभावीकपणे त्यात फक्त गाणीच ऐकली जात होती, पुढे आकाश्वाणीवरचे विविध कार्यक्रम ऐकले जाऊ लागले. त्यानंतरच्या काळात अभ्यासाच्या ध्वनिफितीसुद्धा ऐकल्या गेल्या. एकूण माझ्या श्रवणशक्तीच्या विकासात प्पप्पांनी माझ्यासाठी आणलेल्या त्या टेपरेकॉर्डरचा खूप महत्वाचा वाटा होता. याच टेपरेकॉर्डरवर पप्पांनी सर्वप्रथम माझा आवाज रेकॉर्ड करून मला ऐकवला होता आणि त्यानंतर हे रेकॉर्डिंग कसं करायचं तेही मला शिकवलं होतं.

पप्पांना चांगलं संगीत ऐकायला आवडायचं. ते लोकगितंही आवडीने ऐकायचे तसेच भाव-भक्ती गिते, शास्त्रीय संगिताचा बाज असलेली नाट्यगिते आणि अगदी अलिकडची नवीन गाणीसुद्धा आवडीने ऐकायचे. त्यांच्या या सर्वप्रकारची गाणी ऐकण्याच्या सवयीमुळे मलाही गाणी ऐकण्याची, त्यांचा संग्रह करण्याची आणि पुढे स्वतः गाणी लिहिण्याची सवय लागली. माझी ही गाण्याविषयीची आवड जोपासण्यात पप्पांचे योगदान खूप मोठे आहे. माझ्या या खास आवडीखातर माझ्या प्रत्येक वाढदिवसाला पप्पा माझ्यासाठी एक नवी कॅसेट स्वतः विकत आणून मला भेट म्हणून देत असत. वाढदिवसाखेरीजही एखादी नवी कॅसेट बाजारात आल्याची जर त्यांना बातमी कुठे वाचायला, रेडिओ टीव्हीवर पहायला मिळाली तर ते ती कॅसेट माझ्यासाठी आवर्जून घेऊन येत असत. फावला वेळ मिळाला किंवा कामासाठी बाहेर पडले असताना जवळच एखादं कॅसेटशॉप दिसलं तर ते तिथे नजर टाकून मला आवडू शकेल अशी एखादी कॅसेट दिसली तर ती पटकन खरेदी करत. इतकंच नाही तर, पालक आपल्या पाल्यांना जसे कपडे खरेदीसाठी घेऊन जातात तसे पप्पा मला कॅसेट खरेदीसाठीही अनेकदा घेऊन गेल्याचं मला अगदी लक्खं आठवतय्.

मला खेळता यावेत असे विविध खेळही पप्पा अगदी विचारपुर्वक माझ्यासाठी निवडून आणत असत. एकदा त्यांनी माझ्यासाठी एक खेळ आणला होता ज्यात प्लॅस्टीकची एक सछिद्र जाळी होती आणि विविध रंग व आकारांचे खालून छिद्रात जाण्यासारखे टोक असलेले काही मणी होते. हे मणी त्या जाळीवर सुयोग्य रितीने खोचून विविध आकार तयार करणे असा तो खेळ होता. हा खेळ मला स्वतंत्रपणे खेळता यावा यासाठी त्यासोबत आलेल्या  माहितीपत्रकात जी चित्रे दाखविण्यात आली होती ती सर्व चित्रे पप्पांनी ब्रेल लिपीची संकल्पना वापरून शिलाईमशीनवर सुईच्या सहाय्यानेउठावदार छिद्रांच्यामाध्यमातून मला वाचनीय करून दिली.  त्यामुळे मी ते सर्व आकार समजून घेऊन त्या छिद्रांकीत  जाळीवर मण्यांची सुयोग्य मांडणी करून ती सर्व चित्रे साकार करू शकायचो. मला अगदी जवळून रंगांची ओळख होऊ शकत असल्याने चित्रांतील अपेक्षीत रंगसंगतीसुद्धा मी बरोबर लाऊ शकायचो. आणि त्यामुळे मला माहीत नसलेल्या विविध वस्तुंच्या आकारांची प्रत्यक्ष ओळख झाली. म्हणजे दिवा, पणती, देऊळ, वेगवेगळी चिन्हे, विविध प्रकारच्या गाड्या, विविध प्राणी आणि पक्षी यांचे साधारण आकारतरी या खेळाच्या माध्यमातून मला समजू शकले. तसेच, मी माझ्या मनानेही नवं काही मण्यांच्या माध्यमातून त्या जाळीवर साकारू लागलो. यांसारख्या  एकट्यानेच बसून खेळण्याच्या विविध खेळांमुळे माझ्या कल्पनाशक्तीला, तर्कशक्तीला आणि सर्जनशिलतेलाही खूप खतपाणि मिळाले. अर्थातच, या सर्व मिळकतीमागे माझ्याविषयी प्पप्पांनी सातत्याने केलेला आणि प्रत्यक्षातही आणलेला सकारात्मक कृतिशील विवेकी विचारच प्रभावी होता हे आज खूप प्रकर्शाने जाणवते आहे.

आज कोणत्याही मंचावर निरभीडपणे उभं राहून ठामपणे आपलं म्हणणं समोरच्या श्रोतृवर्गासमोर मांडण्याचं जे थोडं फार कौशल्य माझ्याकडे आहे तेही पप्पांचच देणं आहे. कारण, त्यांनीच अगदी लहान वयातच सर्वप्रथम मला स्टेजवर उभं केलं आणि बोलण्याचा, गाण्याचा आत्मविश्वास दिला. आम्ही रहात असलेल्या परिसरातील सांस्कृतीक कार्यक्रमात मी भाग घ्यावा, गाणं गावं, भाषण करावं यासाठी ते अगदी लहानपणापासूनच आग्रही असायचे. पप्पा संस्थापक असलेल्या आमच्या समाजासाठीच्या सहयोग उत्कर्ष फंड योजनेच्या वार्षीक सर्वसाधारण सभेची सुरुवात अनेक वर्षे माझ्या स्वागतगीत गायनानेच होत होती. सुरवातीला पप्पा आयडीयल बूक डेपोमधून स्वागत गितांची पुस्तके आणून त्यातील त्यांना आवडलेले स्वागत गीत मला वाचून दाखवीत. मलाही ते आवडले की ब्रेलमध्ये उतरवून घेण्यासाठी ते मला डिप्टेटही करीत आणि माझ्याकडून त्याचा सरावही करून घेत. असं त्यांना शक्य होईल त्या प्रत्येक मंचावर मला काहीतरी करायची संधी मिळावी, माझ्यातील सुक्त गुणांना वाव मिळावा  आणि माझा आत्मविश्वास वाढावा यासाठी पप्पा कायमच प्रयत्नशील राहिले.
या स्वागत गीत गायनाच्या संधीमुळेच खरतर माझ्यातले कवित्व जागे झाले. इतरांची स्वागत गिते गाता गाता एकेवर्षी मि स्वतःच त्या समारंभाला साजेसे असे एक स्वागत गीत लिहिले, त्याला श्राव्य संस्कारातून आलेली एक चाल लावली आणि गायलेही.

माझ्यातील कवित्वालाही पप्पांनी भरपूर खतपाणी घातलं. शालेय वयात मी लिहीतअसलेल्या काव्यसदृष्य रचनांचे पहिले श्रोते अर्थात पप्पाच असायचे. ते माझ्या त्या काव्य सदृष्य रचना स्वतःच्या अक्षरांत लिहून घ्यायचे आणि आपल्या जाणकार मित्रमंडळींना दाखवायचे. मग ती मित्रमंडळी त्यांच्यावरील काव्य संस्काराप्रमाणे माझ्या त्या रचनांना वळण लावायची आणि पप्पा त्या सुधारीत कविता मला आणून वाचून दाखवायचे. अर्थात, मला चांगलं मार्गदर्शन मिळावं आणि माझं लेखन आणखीन चांगलं व्हावं यासाठी पप्पा स्वतः ही मेहनत घेत असत.

एकूण काय, तर आज ज्याज्या गुणांमुळे समाजात मी स्वतःची जी काही थोडीफार ओळख निर्माण करू शकलो आहे त्या सर्वच गुणांच्या विकासात माझ्या पप्पांचे योगदान हे अनन्यसाधारण असेच आहे.

माझ्या आंतरीक विकासाकडेच केवळ पप्पांचे लक्ष होते असे नाही तर मला दिसत नसले तरी मी निटनेटकेच राहिले पाहिजे याकडेही त्यांचा पुरेपुर कटाक्ष असायचा. शाळेत असताना माझा गणवेश, बूटमोजे, जराजरी खराब झालेले आढळले तर शिक्षक वा मुख्याध्यापकांनी तकरार करण्याआधी पप्पाच ते बदलून द्यायचे. मी एकटा घराबाहेर जाऊ लागल्यानंतर माझी पांढरी काठी जराजरी पिवळी झालेली आढळली, तिचं इलेस्टीक सैल झालेलं वा तिच्या कांड्या सैल झालेल्या आढळल्या तर नवीन काठी आणता येत नाही का? अशी दमदार विचारणा व्हायची आणि जर मी स्वतःहून काही सुधारणा केली नाही वा नवीन काठी आणली नाही तर एक तर ते असलेल्या काठीत शक्य असल्यास सुधारणा करून द्यायचे नाहीतर फोर्टच्या मुल्ला हाऊस मध्ये असलेल्या नॅबच्या कार्यालयात जाऊन स्वतःच नवी स्टीक घेऊन यायचे. आमचं हातावरचं ब्रेल घड्याळ हे हाताने वेळ भघत वापरायचं असल्याने त्याची आतली डाईल कालांतराने खराब दिसू लागायची. पण पप्पांना खराब दिसणाऱ्या डाईलचं घड्याळ तसंच वापरणं अजिबातच आवडायचं नाही. ते स्वतः घड्याळवाल्याकडे नेऊन ती डाईल साफ करून आणायचे. मला एक अंध व्यक्ती म्हणून लागणाऱ्या विशिष्ट वस्तू मुंबईत जिथे जिथे म्हणून मिळतात ती सगळीच ठिकाणं पप्पांनी माहीत करून घेतली होती. अंधांसाठी टॉकिंग बुक्स उपलब्ध अस्ल्याची माहिती त्यांना मिळाली तेव्हा त्यांनी स्वतः वरळी सीफेसवरील नॅबच्या टॉकिंग बुक्स लायब्ररीत जाऊन माझ्या नावाने तिथे खाते उघडले आणि ते माझ्यासाठी बोलक्या पुस्तकांच्या कॅसेट्स घेऊन आले. अंधांसाठी जेजे काही नवीन उपयुक्त साधन तयार होईल ते मला वापरायला मिळाले पाहिजे यासाठी कितीही धडपड करण्याची पप्पांची तयारी होती आणि ती ते करीतही असत.

माझ्या जडणघडणीतील पप्पांच्या योगदानाची ही यादी न संपणारी आहे. आज ते नसताना हे सारं जिक्या ठळकपणे आठवतय आणि जाणवतय तेवढ्या नेमकेपणाने ते हयात असताना हे सारं जाणवलं नाही हे तितकंच खरं आहे. मी प्रोफेसर व्हावं, पीएचडी करावी अशी त्यांची खूप इच्छा होती. माझा कविता संग्रह छापला जावा असंही त्यांना मनापासून वाटत होतं. पण, पप्पा हयात असताना मी यातलं काहीही केलं नाही. माझ्याकडून कंप्युटरवर मराठी कसं लिहितात हेही त्यांना शिकायचं होतं. आणि बॅंकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना ते शिकवून त्यांच्याकडून त्यांच्या आयुष्यातील आठवणी लिहून घेऊन त्याचं एक पुस्तक छापण्याची माझीही इच्छा होती आणि पप्पांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजीत केलेल्या कार्यक्रमावेळी ती मी जाहीरही केली होती, पण ते होणे नव्हते. आता त्यांनी वेळोवेळी सांगीतलेल्या आणि त्यांच्या प्रत्यक्ष सहवासातून मनात खोल रुजलेल्या त्यांच्या आठवणी जागवत रहाण्यापलिकडे हाती काहीच उरलं नाहीये. म्हणूनच पप्पांच्या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्याच आठवणींच्या या शब्दफुलांसह पप्पांना माझीही भावपूर्ण आदरांजली.